बँकेचा इतिहास

भारतातील पहिल्या दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दीचा संक्षिप्त इतिहास.


दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 108 वर्षाच्या सेवेची वारसा लाभलेली ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहीली जिल्हा सहकारी बँक होय. या बँकेचे अगदी आरंभीचे नांव दि अकोला सेंट्रल अर्बन बँक लि.,अकोला हे होते. सन 1908 मध्ये अकोला जिल्हयातील 12 प्रमुख समाजसेवी लोकांनी मिळून त्याकाळी अस्तित्वात असलेल्या 13 सहकारी संस्थांना कर्ज पुरविणारी सेंट्रल बँक, अकोला येथे काढावी, असा ठराव केला. तशी नोंदणी करण्यासाठी रीतसर अर्जही केला. त्या काळात मा.मि.हेमिंग्वे सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार होते. त्यांनी दि.5 फेबु्रवारी 1909 रोजी बँक रजिष्टर केल्याचे सर्टिफीकेट दिले.

भारतामध्ये 1904 साली सहकारी पतपेढयांचा कायदा पास झाल्यावर अकोला जिल्हयात सन 1908-09 पर्यंत वेगवेगळया प्रकारांच्या 13 सहकारी संस्था स्थापन झाल्या होत्या. सहकाराची तत्वे आणि सहकारी संस्थांचे महत्व लोकांना पटवुन देण्यासाठी सरकारने खास प्रचारक नेमले होते. लोकांची मने सहकाराला अनुकूल करण्याचे पुष्कळसे काम मा.के.पी.भट या अधिकाऱ्याने केले शासनाकडून सहकारी चळवळीला चांगलेच उत्तेजन मिळत असे अशा संस्था स्थापन करण्यात व त्यांना सफलतरा मिळवून देण्यात शासकिय अधिकारी तत्परतेने लक्ष घालीत असत.

अर्थात अकोला जिल्हयात ज्या 13 सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या, त्याचा परस्परांशी काही संबध नसे. त्या संस्थांची सभासदद संख्याही पुष्कळ असल्याने त्यांना चालु गरजा भागविण्यासाठी लागणारा पैसा स्थानिक सावकारांकडून घ्यावा लागत असे. या संस्थांच्या कार्याचा व्याप जसजसा वाढू लागला तसतशी पैसे देणारी एखादी केंद्रीय पेढी असण्याची अधिकाधिक गरज भासू लागली. अशा कंद्री पेढीशी त्या सहकारी संस्था जोडून व तेथूनच सर्व संलग्न संस्थांना कर्ज पुरवठा व्हावा, असा त्या 13 सहकारी संस्थांचे चालक विचार करु लागले.. त्याप्रमाणे विचार करणारे जिल्हयातील प्रमुख लोक सन 1908 च्या जानेवारी महिन्यात एकत्र जमले व अकोला जिल्हयासाठी को-ऑपरेटिव्ह सेंट्रल बँक काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बारा प्रमुख लोकाच्या सहयांनी ही बँक को-ऑपरेटिव्ह रजिस्ट्रारकडे रजिस्टर करण्यासाठी रीतसर अर्ज त्यांनी पाठवला. तो कायद्याप्रमाणे तपासल्यावर मंजूर करण्यात आला व त्या संबंधीचे अधिकृत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर लिहिल्या प्रमाणे 5.2.1909 रोजी रजिस्ट्रार साहेबांची सही होऊन अकोला को-ऑप.सेंट्रल बँक नोंदली गेली.

गेल्या 108 वर्षाच्या कालखंडात बँकेच्या कारभारात पदाधिकारी बदलत गेल्यामुळे बदल घडून आला. सुरवातीला 1930 सालापर्यंत, ज्या मंडळींनी या बँकेची सुरुवात केली व तिला भक्कम पायावर आर्थिक दृष्टीने मजबू केले तो एक कालखंड म्हणावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या कालखंडात जेव्हा आर्थिक मंदी देशात निर्माण झाली व विशेषत: शेतकरी वर्गात शेतीतून उत्पादन अती कमी झाल्यामुळे व शेतमालाचे भाव पडल्यामुळे आपले कर्ज परत करु शण्यास असमर्थ ठरलेल्या लोकांच्य गहाण पडलेल्या अनेक जमिनी बँकेच्या मालकीच्या झाल्या.

आर्थिक मंदीमुळे 1930 ते 40 सालपर्यंतच्या कालावधीत बँकेचा आर्थिक कारभार जवळजवळ बंद होता, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. बँकेजवळ असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी व बँकेचे भाग भांडवल कर्जाचे रूपाने फसल्यामुळे या काळात बँकेजवळ पैशाऐवजी शेतीच भरभक्कम गोळा झाली होती. परंतु 1940 ते 1945 च्या कालावधीत बँकेने मोठया हिंमतीने व धीराने या संकटाला तोंड देऊन या आर्थिक अडचणीवर मात केली आणि जवळ असलेल्या सर्व जमिनी हळूहळू हप्तेवारीने किंवा संपूर्ण किंमत वसूल करून विकल्या. या 10 वर्षाच्या काळात पिकांची परिस्थिती सुधारली. तसे शेतमालाचे भावही वाढले व त्यामुळे शेतकरी मंदीच्या लाटेतून सहीसलामत, सुखरूप बाहेर पडला. बँकेचा कारभार ज्या मंडळीच्या हातात होता ती बहुतांश शहरात राहणारी सुशिक्षित वर्गापैकी होती. बँक उत्तम चालावी, बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत असावी, आर्थिक कायदयाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांना कर्ज द्यावे हीच त्यावेळची विचारप्रणाली होती.

शेतकऱ्यांच्या सुखदु:खाशी समरस होऊन त्यांच्या खऱ्याखुऱ्या अडचणीचा अभ्यास करून त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मनपूर्वक आस्था बाळगून काम करणारी मंडळी 1950 सालानंतर हळूहळू या बँकेच्या संचालक मंडळावर येऊ लागली व त्यांना पदाधिकारी बनण्याचाही योग प्राप्त झाला. म्हणून 1950 पासून तो आजतागायत बँकेची जी भरभराट व प्रगती एकदम झाल्यासारखी आपणांस दिसत आहे, त्याचेही मूळ व मुख्य कारण हेच आहे, असे म्हणावयास हरकत नाही. जे हाडाचे शेतकरी आहेत, ज्यांच्या आयुष्याचा बहुतांश काळ खेडयांमध्ये गेला आहे, ज्यांचे शेतकऱ्यांशी अती निकटचे संबंध आहेत अशा मंडळींनी शेतकऱ्यांच्या उत्कर्षाकरिता काळजीपूर्वक कार्य केले नसते तरच नवल.

आरंभीचे नेतृत्व


सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे अधिकारी किंवा पुढारी कसे होते याचे वर्णन मेहकर येथील सहकार नेते कै.दादासाहेब सोमण यांनी विदर्भातील सहकारी चळवळीसंबंधी काही विचार या शीर्षकाखाली महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या रौप्यमहोत्सवी स्मृतीग्रंथात (1964 साली ) पृ.137 वर लिहिले आहे की, सहकारी अधिकारी व त्यांच्या प्रेरणेने सामाजिक कार्य करणारे सुशिक्षित व काहीतरी समाजसेवा करावी अशा वृत्तीचे पांढरपेशा वर्गातील लोक ही सहकाराची चळवळ वऱ्हाड नागपूर प्रदेशात चालविण्यास पुढे आले. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, हा परोपकारी किंवा भावनिक विचार ही चळवळ सुरू करताना त्यांच्या मनात असला पाहिजे, असे त्या काळचे सहकारसाहित्य, भाषणांचे रिपोर्ट किंवा वृत्तपत्रातील लेख वाचून वाटते. या काळात शहरातील सरकारी अधिकारी, काही व्यापारी, आणि कोर्टकचेऱ्यांतून सावकार विरूध्द शेतकरी असे अनेक खटले चालवून शेतकऱ्यांची ओळख झालेले नगरवासी वकील हे शेतकऱ्यांचा उध्दार करण्यासाठी सुरू केलेल्या चळवळीचे नेते होते. सन 1904 ते 1930 हे पाव शतक, विदर्भातील सहकारी चळवळीचा बाल्यकाल मानावा लागेल. या काळातील पालक सरकार होते आणि संस्थासंचालक पांढरपेशा शहरी संस्कृतीत वाढलेला कायदेपंडितांचा वर्ग होता.

त्या काळातील खालील नावे वाचली तर वरील विधानाची सत्यता पटेल. विदर्भातील सहकारी चळवळीचे आद्य संस्थापक पहिले को.ऑप.रजिस्ट्रार आर.एन.बॅनर्जी (त्रिवेदीनंतरचे को.रजिस्ट्रार) व जी.एस.भालंजा(1937 पर्यंत असलेले को.रजिस्ट्रार) इ.हे सर्व अधिकारी आय.सी.एस.होते.

बी.एस.मूर्ती, महाराष्ट्राचे सहकारमंत्री त्र्यं.शि. उर्फ बाळासाहेब भारदे व रजिस्ट्रार एल.एन.बोंगिरवार यांनी बँकेस भेट दिली. पुढे 1960 चा सहकारी कायदा निर्माण झाल्यामुळे बँकांना काम करणे अधिक सुकर झाले. या बँकेच्या पुढील यशस्वी कारकिर्दीचे शिल्पकार म्हणून अग्रक्रमाने सहकार महर्षी डॉ.वामनराव रामकृष्ण उपाख्य अण्णासाहेब कोरपे व राज्याचे माजी सहकार व कृषि राज्यमंत्री मा.निळकंठ श्रीधरराव उर्फ नानासाहेब सपकाळ तथा मा.डॉ.संतोषकुमार वा.कोरपे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल .

संयुक्त महाराष्ट्रातील बँकेची वाटचाल


विदर्भ विभाग मिळून मुंबई राज्याची 1960 साली निर्मिती झाली व यावेळेपासून सहकारी चळवळीला अकोला जिल्ह्यात विशेष गती मिळाली.ऍड. निळकंठ श्रीधर उर्फ नानासाहेब सपकाळ हे 1959 साली बँकेच्या अध्यक्षपदी तर रामराव झनक हे उपाध्यक्षपदी निवडून आले. माजी आमदार शामराव देवराव धोत्रे हे मानद सचिव होते. तेव्हापासून बँकेची प्रगती अतिशय झपाटयाने होऊ लागली. शेतकऱ्यांना शेतीतून जास्त उत्पादन काढण्याची इर्षा निर्माण झाली व बँकेने आपली पत शेअर भांडवल व ठेवींद्वारे वाढविली. शेतकरी मागतील तेवढा पैसा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. ग्रामीण भागात बँकेने वसुलीचाही उच्चांक मोडला. बँकेच्या या खास कामगिरीचे अवलोकन करण्याकरिता भारत सरकारचे सहकारमंत्री बी.एस.मूर्ती, महाराष्ट्राचे सहकारमंत्री त्र्यं.शि.उर्फ बाळासाहेब भारदे व रजिस्ट्रार एल.एन.बोंगिरवार यांनी बँकेस भेट दिली. पुढे 1960 चा सहकारी कायदा निर्माण झाल्यामुळे बँकांना काम करणे अधिक सुकर झाले. या बँकेच्या पुढील यशस्वी कारकिर्दीचे शिल्पकार म्हणून अग्रक्रमाने सहकार महर्षी डॉ.वामनराव रामकृष्ण उपाख्य अण्णासाहेब कोरपे व राज्याचे माजी सहकार व कृषि राज्यमंत्री मा.निळकंठ श्रीधरराव उर्फ नानासाहेब सपकाळ तथा मा.डॉ.संतोषकुमार वा.कोरपे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

बँकेचा सुवर्ण काळ


महाराष्ट्र राज्याच्या सहकारी कायद्या नंतर 1966 पासून बँकिंग रेग्युलेशन ऍक्टचे नियंत्रणात सहकारी बँका आल्यात व या बँकेचा सुवर्ण काळ सुरू झाला. 1965 साली मा.डॉ.वा.रा.कोरपे हे अध्यक्षपदी निवडून आले तर तत्कालीन आमदार मा.रामरावजी झनक हे उपाध्यक्ष झाले. मा.डॉ.वा.रा.कोरपे यांची धडाडी व अविश्रांत श्रम घेण्याच्या तयारीमुळे सहकारी चळवळीस मिळालेली गती आणखी वाढली. बँकेच्या शाखा 112 पर्यंत गेल्या. पुनर्वसनातून बँक बाहेर काढण्यात डॉ.अण्णासाहेब कोरपे यांच्या अहोरात्र प्रयत्नांना यश आहे. कर्जव्यवहार आणि ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झाली. भुमिपुत्रांची बँक खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांच्या नेतृत्वात सेवारत झाली. हाच काळ बँकेच्या सर्वंकष प्रगती करिता सुवर्ण काळ ठरला.

1993 मध्ये मा.डॉ.संतोषकुमार कोरपे यांचे नेतृत्व बँकेस लाभले. 1993-2003 या दहा वर्षांचे काळात बँकेने राज्यात आपला वेगळा ठसा उमटविला. या काळात सलग तिन वर्षे सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक, असा गौरव प्राप्त झाला. खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात एक सक्षम संस्था म्हणून जिल्हा बँक पुढे आली ती याच काळात. सर्वोत्तम व्यवस्थापन, प्रशासन, योग्य नियोजन यामुळे संस्था सतत प्रगती पथावर राहिली.

 

2003 ते 2007 पर्यंत मा.रमेशराव श्री. हिंगणकर यांचे नेतृत्वात संस्थेच्या भरारीचे सातत्य टिकून राहिले. विविध नव्या योजना, शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय, कमीत कमी कर्जाचा व्याजदर ठेवण्याचा कसोशीचे प्रयत्न बँकेचे अध्यक्ष मा.रमेशराव हिंगणकर व संचालक मंडळ यांनी केला.

ऑगस्ट 2007 मध्ये बँक संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यानंतर डॉ.सुभाषचंद्र कोरपे यांच्या हातात बँकेचे अध्यक्षपदाची सूत्रे आली त्यांनी अकोला, वाशिम जिल्हयातील प्राथमिक सहकारी संस्था सक्षम करण्यास प्रथम प्राधान्य दिले. अकोला,वाशिम जिल्हयातील महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यास सुलभता यावी याकरिता संपूर्ण जिल्हा दौरा करून अकोला व वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण 13 तालुक्यात महिला सदस्यांपर्यंत बचत गटाच्या योजना पोहोचवून महिला सक्षमीकरणास मोठा हातभार लावला.अकोला,वाशिम जिल्ह्यातील सर्व शाखांचे दूरध्वनी नेटवर्क तयार करून सर्व शाखांना मुख्य कार्यालयाशी जोडण्यात आले बचत गटांना उद्योग गट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे पहिले पाउल म्हणून गटांना रॉकेलचे परवाने मिळवून देण्याचे यशस्वी प्रयत्न केले. बँकेच्या जिल्हा परिषद शाखेत बायोमॅट्रीक ए.टी.एम. ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बायोमॅट्रीक ए.टी.एम.मुळे ग्रामीण भागातील निरक्षर खातेदारास आपले बोटाचा ठसा लावून रक्कम काढण्याची सुविधा मिळाल्यामुळे तांत्रीक क्लिस्टता कमी झाली व सुरक्षितता वाढली.

मा.डॉ.संतोषकुमार कोरपे हयांचे मार्गदर्शन बँकेच्या संचालक मंडळास सतत लाभलेले आहे. बँकेचे आर्थिक मानदंड व नियोजन, आधुनिकिकरण, बँकेचा व्यावसायीक दृष्टीकोण अशा अनेक बाबींमध्ये डॉ.संतोषकुमार कोरपे यांची मौलीक मार्गदर्शकाची भुमिका राहीलेली आहे. दि.14 जुलै 2009 मध्ये पुन्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा मा.डॉ.संतोषकुमार कोरपे यांचेकडे आल्यावर तर त्यांनी या बाबींना आयाम देण्यास सुरवात केली. अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर माहे ऑगस्ट 2009 मध्ये बँकेच्या कोअरबँकिंग प्रणालीसह संगणकीकरणाचा आराखडा तयार करून नियोजनबध्द अंमलबजावणी केली व माहे फेब्रु.2010 मध्ये हे काम पूर्ण करून मार्च 2010 पासून बँकेच्या 54 शाखा कोअरबँकिंगसह संगणकीकृत करण्यात आल्या. उर्वरीत शाखांचे संगणकिकरण करून 100% शाखांच्या कोअरबँकिंगच्या वाटचालीस लगेच प्रारंभ केला. बँकेच्या संपूर्ण 107 शाखा विस्तारकक्षासह कोअर बँकींगसह संगणकीकृत केल्या आहेत. तसेच बँकेकडून एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस. ची सुविधा उपलब्ध करु दिली आहे.

शाखा विस्तार


1972 साली महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू केली व कापसाचे चुकारे जिल्हा सहकारी बँके मार्फतच करण्यात आले. त्यामुळे लोकांच्या सोयी करिता जिल्हा सहकारी बँकेचा खालील प्रमाणे शाखा विस्तार झाला.

 • 1909 ते 1930 - 2 शाखा

 • 1930 ते 1970 - 25 शाखा

 • 1970 ते 1980 - 25 शाखा

 • 1981 ते 1990 - 50 शाखा

 • 1991 ते 2000 - 11 शाखा

 • 2001 ते 2012 - 3 शाखा (पैकी 2 विस्तारपटल)

 • 2012 ते 2013 - 1 शाखा (पैकी 1 विस्तार पटल)

 • 2013 ते 2014 - 1 शाखा

 • 2014 ते 2015 - 1 शाखा (पैकी 1 विस्तार पटल)

 • 2015 ते 2016 - 2 शाखा (पैकी 1 विस्तार पटल)

 • 2016 ते 2017 - 2 शाखा

एकुण शाखा विस्तार 119 शाखा पर्यंत झाला. त्यापैकी 8 शाखा सक्षम नसल्यामुळे बंद करण्यात आल्या व 3 शाखांचे विलीनीकरण करण्यात आले. आज रोजी बँकेच्या 107 शाखा व 5 विस्तार कक्ष कार्यरत आहेत.

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.